कळंब (प्रतिनिधी)- नवसाला पावणारी ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंबाबाई देवीच्या नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेने सुरुवात झाली. नवरात्राचे दहा दिवस येथे भक्तांची मांदियाळी असते. कळंब शहरातील परंतु कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येतात. अंबाबाई देवी नवसाला पावणारी असल्याची भक्तांची तसेच शहरवासीयांची श्रद्धा आहे. अंबाबाई (देवी) मंदिर हे कळंब शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. दरवर्षी नवरात्र ते कोजागरी पौर्णिमा या कालावधीत येथे यात्रेसमान गर्दी असते.
नवरात्र उत्सव काळात मंदिर व परिसर सजवला जातो. सकाळी चार वाजल्यापासून भाविक दर्शनासाठी येतात. सकाळची काकड आरती व संध्याकाळची शेजारती तसेच नवरात्रिच्या नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. मंदिर परिसरामध्ये पूजेच्या साहित्याची व प्रसादाची दुकाने लागतात व या परिसराला यात्रेचे स्वरूप असते. मंदिर परिसरात भाविकांच्या सोयी सुविधांसाठी मंदिर समिती बरोबर नगरपालिका कार्यरत असते. नवरात्र महोत्सव यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. अंबाबाई (देवी) मंदिर हे कळंब शहराचे ग्रामदैवत म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाते. कळंबचे ग्रामदैवत अंबाबाई देवी मंदिर पुरातन मंदिर असून पूर्वी चुना मातीत बांधलेले होते. काही वर्षांपूर्वी भाविकांच्या योगदानाने मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. मोठ्या संख्येने भाविक भक्त मंदिरात नवस फेडण्यासाठी येतात.
