येरमाळा (प्रतिनिधी)- तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून परिचित असणाऱ्या श्री येडेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची तयारी झाली आहे.रविवार (ता.१०) अश्विन शुद्ध प्रतिपदेस रात्री आठला देवीची पंचोपचार महापूजा, महाआरती घटस्थापनेने श्री येडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास सुरवात होणार आहे.

श्री तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून श्री येडेश्वरी देवी प्रसिद्ध असल्याने तुळजाभवानीचे दर्शन झाल्यानंतर प्रत्येक भाविक येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येतो. नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून येडेश्वरी देवी महाराष्ट्रासह परराज्यांत प्रसिद्ध आहे. नवरात्रकाळात देवीच्या वेगवेगळ्या रूपांच्या पूजा दररोज देवीच्या तांदळ्यावर बखाड्या लिंबाच्या पत्री पानाने नवरात्रीच्या प्रत्येक माळेच्या महात्म्याप्रमाणे केल्या जातात. यामध्ये रवीवारी घटस्थापनेदिवशी पारंपरिक नागवेलीच्या पानाने महापूजा,महाआरती घटस्थापना होणार आहे.रात्रजागर भजनी मंडळ येरमाळा,बाभळगाव यांचा भजनी कार्यक्रम होणार आहे.


असा आहे कार्यक्रम

ता. १२ : एक वेढ्याची पूजा; रात्रजागर पानगाव, परतापूर, सटवाईवाडी मंडळाचा भजनी कार्यक्रम. ता. १३ : दोन वेढ्याची पूजा; तर रात्रजागर उमरा, मलकापूर मंडळाचा भजनी कार्यक्रम. ता. १४ : चंद्राची पूजा; रात्रजागर नागझरवाडी येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम. ता. १५ : मोराची पूजा; रात्रजागर शेलगाव (ज.) येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम. पाचव्या माळेला ललित पंचमी पंचरात्रीनिमित्त रात्री नऊला देवीच्या पालखीचा छबिना होणार आहे. या दिवशी विविध प्रकारे देवीचे नवरात्रीचे व्रत करणाऱ्या महिला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. ता. १६ : आकड्याची पूजा; रात्रजागर कसबे तडवळे येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम. ता. १७ : नारळाची पूजा; रात्रजागर कन्हेरवाडी, बांगरवाडी येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम. ता. १८ : साखळीची पूजा; रात्रजागर उक्कडगाव (ता. बार्शी), उपळाई येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम. ता. १९ : वाघाची पूजा; घारी व खांडवी (ता. बार्शी ) येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम. ता.२० नवमीनिमित्त उत्तररात्री होमहवन आरंभ,तर आश्विन शुद्ध नवमीच्या पहाटे सूर्योदयापूर्वी होमहवन पूर्णाहुती बलिदाननंतर देवीची महापूजा,आरतीनंतर देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात येईल.विजयादशमीला सीमोल्लंघन विजयादशमीनिमित्त सायंकाळी पाचला देवीच्या पालखीसह सीमोल्लंघन होईल.


कोजागरी पौर्णिमेला बारवाची पूजा

ता.२६ सोमवारी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी बारवाची पूजा करण्यात येणार आहे.रात्री नऊला देवीच्या पालखीसह छबिना होणार आहे.नवरात्र महोत्सव काळात दररोज पहाटे,तर रात्री साडेआठला देवीची पंचोपचार पूजा-आरती होणार आहे,असे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top