धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील नागरी वस्ती, शाळा, महाविद्यालये व रुग्णालयांच्या परिसरालगत असलेला कचरा डेपो तात्काळ व कायमस्वरूपी स्थलांतरित करावा असा निर्वाणीचा इशारा युवा सेना जिल्हाप्रमूख रविंद्र वाघमारे व नगरसेवक पंकज पाटील, गणेश नगर शाखाप्रमुख अक्षय खळदकर यांनी मुंबई येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव शहरातील नागरी वस्तीलगत असलेल्या कचरा डेपोमध्ये शहरातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला जात आहे. या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून कचरा साठविण्यात येत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये व नागरी वस्ती असल्याने प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठविल्यामुळे माशा, डास, भटकी जनावरे व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी परिसरात नागरिकांसह शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तसेच रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण व आजारी व्यक्तींना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
रुग्णालयांमधील खराब झालेल्या औषधांच्या बाटल्या, वैद्यकीय कचरा व इतर प्रकारचा कचरा टाकला जात असल्याच्या तक्रारी आहेत. शिवाय मृत जनावरेदेखील या ठिकाणी टाकली जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात असल्याने त्यातून निघणारा धूर संपूर्ण शहरात पसरतो. त्यामुळे हवेची गुणवत्ता खालावत असून, दुर्गंधी व विषारी धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास, दमा, तीव्र खोकला, घशाचे विकार व फुफ्फुसांशी संबंधित आजार बळावले धोका आहेत. नागरिकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. उपचारासाठी अनावश्यक आर्थिक खर्चाचा भारही नागरिकांवर पडत आहे. विशेषतः या परिसरात डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, कॉलरा व कावीळ यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
पावसाळ्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून झिरपणारे दूषित पाणी जमिनीत मुरून परिसरातील तसेच शहरातील भूगर्भातील पाण्याचे स्रोत, विहिरी व बोअरवेल दूषित होऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरी वस्तीबरोबरच शाळा, महाविद्यालये व रुग्णालये असलेल्या परिसराच्या जवळ अशा प्रकारे कचरा साठविणे व तो जाळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
याची दखल घेऊन या कचरा डेपोची प्रत्यक्ष पाहणी करून शहरातील सर्व भागांतील कचरा नागरी वस्ती, शाळा, महाविद्यालये व रुग्णालयांच्या परिसरालगत टाकला जाणार नाही, यासाठी योग्य ती उपाययोजना करावी आणि कचरा डेपो तात्काळ व कायमस्वरूपी अन्य योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा अशी मागणी रविंद्र वाघमारे व पंकज पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी यांच्याकडे केली आहे.
कचरा डेपो अन्य योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय,नगर परिषद कार्यालय तसेच पालकमंत्री व पर्यावरणमंत्री यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून तक्रारी करण्यात आल्या आहेत. उपोषण करुनही या गंभीर समस्येवर अद्याप ठोस व प्रभावी कार्यवाही झालेली नाही.
