धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर येथे येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी आणि धार्मिक उत्सवाचे पावित्र्य लक्षात घेऊन शहरातील सार्वजनिक शांतता,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तुळजापूर नगर परिषद हद्दीतील सर्व प्रकारच्या किरकोळ देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.

तुळजापूर येथे 11 ते 27 ऑक्टोबर 2026 या कालावधीत श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे.या काळात देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक तुळजापुरात दाखल होतात. महोत्सवातील धार्मिक विधी, उत्सवाचे पावित्र्य आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात शांततापूर्ण वातावरण राखण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी मुंबई दारूबंदी कायदा, 1949 मधील कलम 142 (1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून तुळजापूर नगर परिषद हद्दीतील सर्व प्रकारच्या किरकोळ देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या 11 ऑक्टोबर 2026 रोजी घटस्थापनेच्या दिवशी,20 ऑक्टोबर 2026 रोजी दसरा सणाच्या दिवशी होणाऱ्या विसर्जन व होमावरील धार्मिक विधीच्या निमित्ताने,तसेच 25 ऑक्टोबर 2026 रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत भाविकांना सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरणात देवीचे दर्शन घेता यावे, तसेच धार्मिक कार्यक्रम सुरळीत पार पडावेत, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.तुळजापूर नगर परिषद हद्दीतील संबंधित सर्व किरकोळ देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी आदेशात नमूद केलेल्या तीनही दिवशी मद्यविक्री बंद ठेवून प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे,असे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी निर्देश दिले आहेत.


 
Top