धाराशिव (प्रतिनिधी)- कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2016 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत जिल्ह्यातील 13 हजार 700 थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी तातडीने आधार प्रमाणीकरण करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 22 जुलै 2026 रोजी 533 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली.त्यानंतर 24 जुलै 2026 रोजी राज्यातील सुमारे 16.96 लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी,11 सप्टेंबर 2026 रोजी सुमारे 3.56 लाख शेतकऱ्यांची तिसरी यादी आणि 12 ऑक्टोबर 2026 रोजी 3.51 लाख शेतकऱ्यांची चौथी यादी आधार प्रमाणीकरणासाठी राज्यस्तरावर जाहीर करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही या याद्यांमधून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत आहे. दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील 46 हजार 915 थकीत कर्जदार शेतकऱ्यांची गावनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.तिसऱ्या यादीत 21 हजार 966 थकीत कर्जदार शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली.आता 12 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या चौथ्या यादीत जिल्ह्यातील आणखी 13 हजार 700 थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व याद्यांमधील जिल्ह्यातील एकूण 82 हजार 51 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.संबंधित शेतकऱ्यांना आपल्या नावाचा समावेश यादीत आहे किंवा नाही,याची माहिती सहज उपलब्ध व्हावी,यासाठी याद्या वेगवेगळ्या मोबाईल ग्रुपवर तसेच प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालय,तलाठी कार्यालय आणि चावडीवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील 49 हजार 794 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर आतापर्यंत कर्जमाफीची 457 कोटी 18 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया प्रत्यक्ष लाभाच्या टप्प्यापर्यंत पोहोचली असून,अद्याप आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांनीही ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. कर्जमाफीसाठी बँकेत कोणतीही रक्कम भरू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे.