धाराशिव (प्रतिनिधी)- शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून पिकांच्या मुळांपर्यंत थेट पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या ‘रूट झोन ड्रिप इरिगेशन टूल' या अभिनव उपकरणासाठी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथील भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. कुणाल हनमंतराव वनंजे यांना भारत सरकारचे पेटंट मंजुर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
हे उपकरण पारंपरिक ठिबक सिंचन प्रणालीसोबत वापरता येणारे, पुनर्वापर करता येणारे, कमी खर्चाचे, सहज बसविता येणारे आणि पर्यावरणपूरक स्वरूपाचे आहे. उपकरणाच्या माध्यमातून ठिबक सिंचनातून मिळणारे पाणी जमिनीच्या पृष्ठभागावर न साचता पिकांच्या मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रात पोहोचविला जातो.
मराठवाड्यासह कमी पर्जन्यमान आणि वारंवार दुष्काळाचा सामना करणाऱ्या भागांमध्ये पाण्याची उपलब्धता ही शेतीसमोरील मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करणे आवश्यक आहे. या उपकरणामुळे पिकाच्या मुळांच्या परिसरात आवश्यक ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्यास मदत होते.पारंपरिक पीके व फळबागा यांसाठी हे तंत्रज्ञान वापरता येते. या तंत्रामुळे शेतात पिकाचा प्रकार, मातीचा प्रकार, हवामान, सिंचनाचे वेळापत्रक यानुसार 30 ते 40 टक्के पाण्याची बचत होऊ शकते. म्हणजे जर 1 एकरासाठी पूर्वी 1 लाख लिटर पाणी लागत असल्यास या तंत्रामुळे सुमारे 30 ते 40 हजार लिटर पाणी वाचू शकते.
कमी खर्चात पुनर्वापरयोग्य उपकरण
या उपकरणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते पुनर्वापर करता येण्याजोगे असून शेतकऱ्यांना पारंपरिक ठिबक सिंचन व्यवस्थेत त्याचा वापर करता येतो. उपकरणाची रचना तुलनेने सोप्या पद्धतीने बसविता येणारी आणि कमी खर्चाची असल्याने लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठीही त्याचा विचार करता येऊ शकतो.
पाण्याची नासाडी कमी करणे, मुळांच्या परिसरात आर्द्रता टिकविण्यास मदत करणे, उपलब्ध जलस्रोताचा कार्यक्षम वापर करणे आणि ‘प्रत्येक थेंबाचा योग्य उपयोग' या संकल्पनेला प्रोत्साहन देणे, हे या उपकरणाचे प्रमुख उद्देश आहेत.
