तुळजापूर (प्रतिनिधी)- अपुऱ्या पावसाचा फटका यंदाच्या सोयाबीन उत्पादनाला बसल्याचे तुळजापूर शहरातील पीक कापणी प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. नळदुर्ग रोडवरील सर्व्हे क्रमांक 173 मधील शेतकरी प्रशांत सिताराम अमृतराव यांच्या शेतात ग्रामस्तरीय समितीमार्फत करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगात अर्ध्या गुंठ्यात काढणीसह सोयाबीनचे वजन अवघे 1 किलो 355 ग्रॅम भरले. त्यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले.

तुळजापूर शहर विभागात एकूण 12 ठिकाणी पीक कापणी प्रयोग करण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिला प्रयोग अमृतराव यांच्या शेतात घेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,  गिरधावर अमर गांधले, कृषी सहाय्यक रंजना मुळे, तलाठी शरद दूधभाते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी, अपुऱ्या पावसामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. पीक कापणीचे प्रयोग व पंचनामे वेळेत पूर्ण करून त्यानंतर आवश्यक याद्या तयार करण्याचे काम तातडीने सुरू करावे, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, सर्वसाधारणपणे एका हेक्टरमध्ये सुमारे 8 क्विंटल सोयाबीन उत्पादन अपेक्षित धरले जाते. मात्र, या पीक कापणी प्रयोगानुसार हेक्टरी उत्पादन अवघे 3.25 क्विंटल राहिले. त्यामुळे अपेक्षित उत्पादनाच्या तुलनेत सुमारे 4.75 क्विंटलची घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. तुळजापूर शहरातील उर्वरित 11 ठिकाणीही पीक कापणी प्रयोग करण्यात येणार आहेत. सर्व प्रयोगांमधून मिळणाऱ्या उत्पादनाची सरासरी काढल्यानंतर अंतिम उत्पादनाचा अंदाज निश्चित केला जाईल. त्यानंतर शासनाच्या नियमानुसार पीक विमा नुकसानभरपाईच्या वितरणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात पावसाअभावी सोयाबीन पिकाची झालेली दयनीय अवस्था या प्रयोगातून समोर आल्याने शेतकऱ्यांना पीक विमा व शासनाच्या मदतीकडे आता लक्ष लागले आहे.

 
Top