धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा पूर्ण दुष्काळी जाहीर करून शेतकरी व शेतमजुराच्या पाल्याची संपूर्ण शैक्षणिक फीस माफ करण्यात यावी तसेच मोफत शालेय साहित्य देण्यात यावे. शेतकरी आणि त्या शेतीवर अवलंबून असलेल्या व उपजीविका करणाऱ्या शेतमजुराचा मुख्य आधार असलेली शेतातील सर्व पिकेच पूर्णपणे करपून वाया गेलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. तर शेतमजुरांना 25 हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात यावा यांसह इतर विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भराटे यांच्या नेतृत्वाखाली दि.6 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, विविध मागण्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत लोमटे, रामहरी लोकरे (खेर्डा), गोपाळ यादव नागझरवाडी चंद्रकांत स्वामी पारा पोपट भराटे (अमळनेर), सचिन भराटे, अंबऋषी भराटे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
