वाशी (प्रतिनिधी)- वाशी पोलिस ठाण्याच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गणेश मंडळांच्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, वाशी येथील कर्मवीर गणेश मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला. मंडळाला 51 हजार रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत गणेशोत्सवातील देखावे, सामाजिक उपक्रम, शिस्त, स्वच्छता आणि जनजागृतीपर उपक्रमांची दखल घेण्यात आली.
वाशी येथील सर्वोत्तम मंगल कार्यालयात बुधवारी (दि. 7) स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. जिल्हा पोलिस अधीक्षक रितु खोकर यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. हातोला येथील राजा शिवछत्रपती गणेश मंडळाने द्वितीय क्रमांक मिळवत 31 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. तृतीय क्रमांकासाठी वाशी येथील शिवभक्त तरुण गणेश मंडळ आणि पारा येथील संघर्ष गणेश मंडळाची निवड करण्यात आली. दोन्ही मंडळांना प्रत्येकी 11 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. उत्तेजनार्थ पुरस्कार पारा येथील आदर्श गणेश मंडळ, फक्राबाद येथील जय गणेश मंडळ आणि पारगाव येथील मोरया गणेश मंडळाला देण्यात आला.
पारितोषिकापेक्षा सामाजिक बांधिलकीला प्राधान्य
स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्यानंतर पारा येथील संघर्ष गणेश मंडळाने मात्र एक वेगळा आदर्श घालून दिला. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असताना मिळालेले 11 हजार रुपयांचे पारितोषिक मंडळाने स्वतःसाठी न वापरता मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक रितु खोकर यांच्याकडे या रकमेचा धनादेश सुपूर्द केला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक रितु खोकर, उपविभागीय अधिकारी प्राजक्ता पाटील, तहसीलदार प्रकाश म्हेत्रे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले, कळंबचे उपविभागीय पोलिस अधिकारी मोहिते, पोलिस निरीक्षक शंकर शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अजयसिंह भाळे, गुणांकन समितीचे अध्यक्ष एस. एल. पवार, सचिव डॉ. निळकंठ भराटे, सदस्य नेताजी नलवडे, ॲड. महेश आखाडे, अजिनाथ मुळे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व पोलिस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एम. डी. उंदरे यांनी केले, तर आभार पोलिस उपनिरीक्षक संजय झराड यांनी मानले.
