तुळजापूर (प्रतिनिधी)- यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद व मूग या नवीन शेतमालाची आवक तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू झाली आहे. बुधवार, दि. 7 ऑक्टोबर रोजी बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल 6 हजार 525 रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळाला. बार्शी, सोलापूर, लातूर तसेच जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत तुळजापूर बाजार समितीत सोयाबीनला मिळालेला हा दर अधिक असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील शेतकरी पावसाच्या पाण्यावर तसेच उपलब्ध पाण्याचा काही प्रमाणात वापर करून घेतलेला सोयाबीन, उडीद व मूग बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. दुष्काळामुळे बाजार समितीतील शेतमालाची आवक सध्या तुलनेने कमी आहे. मात्र, उपलब्ध दर्जेदार शेतमालाला शासनाच्या हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळत आहे.
बाजार समितीच्या माहितीनुसार, बुधवारच्या बाजारभावात सोयाबीनला हमीभाव 5,708 रुपये असताना बाजार समितीत 6,525 रुपये, उडदाला हमीभाव 8,200 रुपये असताना 9,825 रुपये, हिरव्या मुगाला हमीभाव 8,780 रुपये असताना 9,550 रुपये, तर पिवळ्या मुगाला. 8780 रुपये भाव असताना 17,000 रुपये असा बाजारभाव मिळाला. दरम्यान, शेतकऱ्यांना अधिक पैशांचे आमिष दाखवून काही व्यापारी बांधावरच शेतमाल खरेदी करीत असल्याची बाब बाजार समितीच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रलोभनांना बळी न पडता आपला शेतमाल बाजार समितीत आणून विक्री करावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती संतोषदादा बोबडे व उपसभापती सुहास गायकवाड यांनी केले आहे. दुष्काळाच्या संकटात पिकविलेल्या शेतमालाला चांगला दर मिळत असल्याने तुळजापूर बाजार समिती शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.