कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा येथे उपक्रमशील मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या संकल्पनेतून व उपक्रमशील शिक्षिका शिवानंद स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने जागर स्त्रीशक्तीचा सन्मान कर्तुत्वाचा हा अभिनव उपक्रम  राबविण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका शिवनंदा स्वामी यांनी केले. आजचे पहिले पुष्प प्रसिद्ध शिवव्याख्याते श्री. महादेव खराटे यांच्या अभ्यासपूर्ण वाणीतून राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या चरणी अर्पण करण्यात आले. याप्रसंगी जिजाऊंच्या लेकी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतून माँसाहेब जिजाऊ यांचे कार्य विशद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक तुकाराम कराळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षक बलभीम राऊत यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी शाळेच्या वतीने सर्व उपस्थित माता पालक व विद्यार्थी यांना केळीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला गावातील बहुसंख्या माता पालक उपस्थित होत्या. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दररोज एक याप्रमाणे भारताच्या, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये प्रचंड मोठे कार्य केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, माता रमाबाई, सरोजिनी नायडू, प्रसिद्ध धावपटू पी टी उषा, शास्त्रज्ञ अंतराळवीर कल्पना चावला, सुनीता विल्यम, अनाथाची माय सिंधुताई सपकाळ, ज्येष्ठ समाजसेविका सुधा मूर्ती इत्यादी कर्तुत्वान महिलांची यशोगाथा विद्यार्थ्यांना सांगितली जाणार आहे.

 
Top