येरमाळा (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.येडेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त देवीच्या मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रंगीबेरंगी दिव्यांच्या मनमोहक सजावटीमुळे संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला असून, रात्रीच्या वेळी मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्युतरोशनाईमुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
देवीचा वार मंगळवार असल्याने आणि नवरात्रोत्सवाची तिसरी माळ असल्याने श्री.येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. श्री.येडेश्वरी देवीच्या मंदिराच्या कळसावर,मंदिरातील दर्शन सभामंडपात,मंदिराच्या पायऱ्यावरील शेडला,मंदिराच्या प्रवेश कमाणीला कोलकत्त्याच्या कालिका मातेच्या मंदिराच्या देखावा तयार करुन आकर्षक देखावा तयार करण्यात आला आहे. हा कालिका माता मंदिराचा यावर्षीच्या विद्युत रोशनीचा देखावा नवरात्रीचे मुख्य आकर्षण आहे.
परिसरात करण्यात आलेली विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. विविध रंगांच्या प्रकाशाने सजलेले मंदिर, उजळलेला परिसर आणि भक्तिमय वातावरण यामुळे नवरात्रोत्सवाच्या आनंदात भर पडली आहे. संध्याकाळच्या वेळी या रोषणाईचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी भाविकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण होत आहे.नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून,‘आई राजा उदे उदे', ‘ येडु सरीचा उदे उदें' अशा जयघोषाने परिसर भक्तिमय होऊन गेला आहे. देवीवरील अढळ श्रद्धा,परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम नवरात्रीच्या उत्सवातून अनुभवायला मिळत आहे. श्री. येडेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवामुळे परिसरात धार्मिक चैतन्य निर्माण झाले असून, आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिराच्या सौंदर्यात विशेष भर घातली आहे. भक्तांच्या श्रद्धेने आणि उत्साहाने नवरात्रोत्सवाचा सोहळा अधिकच मंगलमय बनला आहे. देवीच्या गाभाऱ्यात देवीच्या विरुद्ध दिशेला मंगळवारी देवीच्या एका प्रतिमेभीवती फुलांनी शेषनागाची सजावट करण्यात आली होती. दर्शनाला आलेला भाविक ही सजावट पाहण्यात गुंतल्याचे दिसत होते.


