भुम (प्रतिनिधी)-  भूम शहरातील विविध प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांअभावी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, मागील काही काळापासून रखडलेली विकासकामे तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा तथा महिला व बालकल्याण सभापती लक्ष्मी प्रशांत साठे यांनी आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.

नगर परिषद हद्दीतील नागरोत्थान, जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) तसेच अमृत 2.0 योजनेंतर्गत विविध विकासकामे प्रस्तावित आहेत. मात्र, निधीअभावी अनेक कामांना अद्याप गती मिळालेली नाही. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पुढील 10 ते 15 वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे साठे यांनी निवेदनात म्हटले आहे. नगर परिषदेची निवडणूक होऊन सुमारे वर्षभराचा कालावधी उलटला असतानाही प्रभागनिहाय विकासासाठी अपेक्षित निधी उपलब्ध झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे रस्ते, नाल्या, स्वच्छतागृहे आणि सामाजिक सभागृहांसारख्या मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

 
Top