भुम (प्रतिनिधी)- सेवा संकल्प अभियानांतर्गत पोलीस ठाणे , भूम आणि ग्रामीण रुग्णालय, भूम  यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 07 ऑक्टोबर 2026 रोजी पोलीस ठाणे भूम येथील अधिकारी व अंमलदारांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सदर आरोग्य शिबिरास पोलीस अधीक्षक, धाराशिव रितु खोखर(भा.पो.से.) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, भूम अनिल चोरमले उपस्थित होते. पोलीस अधीक्षक यांनी शिबिरास स्वतः उपस्थित राहून अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्याची चौकशी केली तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

या शिबिरामध्ये पोलीस ठाणे भूम तसेच उपविभागीय कार्यालय येथील 48 अधिकारी व अंमलदारांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये BMI, ECG, रक्तदाब, CBC, BSL, Lipid Profile, Liver Function Test, Kidney Function Test, T3, T4, TSH, Troponin-T  आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच मौखिक तपासणी, दंत तपासणी, डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व प्राथमिक मौखिक कॅन्सर स्क्रीनिंग करण्यात आले. सदर तपासणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर व वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. कुटे, डॉ. भडके व डॉ. फाळके यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी अधिकारी व अंमलदारांना योग्य आहार, आवश्यक औषधोपचार, नियमित आरोग्य तपासणी तसेच आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वेळेवर वैद्यकीय सेवा घेण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचे आरोग्य उत्तम राहावे, तसेच संभाव्य आरोग्यविषयक समस्या वेळेत निदर्शनास याव्यात, या उद्देशाने सदर आरोग्य शिबिराचे आयोजन श्री.अमोल मोहिते परी.पोलीस उप अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी भूम यांचे कडून करण्यात आले.

 
Top