धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात कीटकजन्य आजारांचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.डासांची उत्पत्ती रोखणे,घरात डासांचा प्रवेश टाळणे आणि ताप आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे,या उपाययोजनांमुळे कीटकजन्य आजारांपासून बचाव करता येऊ शकतो.

पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण होते.घरातील पाण्याची भांडी,ड्रम,टाक्या तसेच परिसरातील पाणी साठे याकडे नागरिकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.पाणी वाहते करावे. गटारे नाल्या स्वच्छ कराव्यात, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात डास उत्पती  होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास,अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनयशिल कुलकर्णी यांनी केले आहे.


खिडक्यांना जाळ्या बसवा

डासांचा घरामध्ये प्रवेश होऊ नये यासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.दरवाजे व खिडक्या शक्यतो बंद ठेवून घरात डासांचा वावर कमी करण्याची काळजी घ्यावी.


झोपताना मच्छरदाणीचा वापर करा

रात्री झोपताना मच्छरदाणीचा नियमित वापर करावा.विशेषतः लहान मुले,वृद्ध आणि आजारी व्यक्तींना डासांपासून संरक्षण मिळेल याची दक्षता घ्यावी.


आठवड्यातून एक दिवस ‌‘कोरडा दिवस' पाळा

आठवड्यातून एक दिवस ‌‘कोरडा दिवस' पाळावा.या दिवशी घरातील पाणी साठविण्याची सर्व भांडी,ड्रम व टाक्या रिकाम्या करून आतून घासून स्वच्छ कराव्यात.घराच्या परिसरात कुठेही पाणी साचले असल्यास ते तातडीने काढून टाकावे.


सेप्टिक टँकच्या पाईपला जाळी लावा

सेप्टिक टँकच्या पाईपला योग्य प्रकारे जाळी बसवावी.या माध्यमातून डासांची उत्पत्ती होणार नाही,याची दक्षता घ्यावी. घराभोवती अनावश्यक पाणी साचणार नाही,याचीही काळजी घ्यावी.


कोणताही ताप अंगावर काढू नका

ताप,अंगदुखी,डोकेदुखी,थंडी वाजणे,अशक्तपणा यांसारखी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.कोणताही ताप अंगावर काढू नका.वेळेत तपासणी व उपचार घेण्यासाठी जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा.

स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका

ताप आल्यास स्वतःच्या मनाने औषधोपचार करू नयेत.तसेच केवळ औषध दुकानातून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.तापाचे नेमके कारण समजून घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासणी व उपचार करून घ्यावेत.


नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा

कीटकजन्य आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाच्या उपाययोजनांसोबत नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे.प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरात व परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही,यासाठी नियमित पाहणी करावी.पाणी साठविण्याची भांडी झाकून ठेवावीत आणि अनावश्यक पाणी साठे नष्ट करावेत.डासांची उत्पत्ती रोखा,कीटकजन्य आजार टाळा आणि निरोगी धाराशिवसाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


 
Top