धाराशिव (प्रतिनिधी)- विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत,मुक्त,निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पडावी. तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता,कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,यासाठी जिल्ह्यात 21,22,23 आणि 27 ऑक्टोबर 2026 या चार दिवशी निर्धारित कालावधीत मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व संबंधित देशी-विदेशी मद्यविक्रीची घाऊक व किरकोळ दुकाने तसेच ताडीविक्री अनुज्ञप्ती निर्धारित कालावधीत बंद राहणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार औरंगाबाद विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवार,23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून, मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानापूर्वीचे 48 तास, मतदानाचा दिवस आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधित्व अधिनियम,1951 मधील कलम 135 (सी) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम,1949 मधील कलम 142 (1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील संबंधित मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार बुधवार,21 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी चार वाजल्यापासून जिल्ह्यातील मद्यविक्री बंद राहील.गुरुवार, 22 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजे शुक्रवार,23 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी चार वाजेपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे. तसेच मंगळवार,27 ऑक्टोबर 2026 रोजी मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.हे निर्बंध संपूर्ण धाराशिव जिल्ह्यास लागू राहतील.
या आदेशाच्या कार्यक्षेत्रात देशी व विदेशी मद्याची घाऊक व किरकोळ विक्री करणाऱ्या सर्व संबंधित अनुज्ञप्तींचा समावेश करण्यात आला आहे.यामध्ये नमुना एफएल-1,एफएल-2,एफएल-3, एफएल-4 (क्लब अनुज्ञप्ती),एफएल/बीआर-2,सीएल-2,सीएल-3,सीएल/एफएल/टीओडी-3,टीडी-1 तसेच इतर संबंधित मद्यविक्री व ताडीविक्री अनुज्ञप्तींचा समावेश आहे.संबंधित सर्व अनुज्ञप्तीधारकांनी आदेशात नमूद केलेल्या कालावधीत आपले मद्यविक्री व्यवहार पूर्णपणे बंद ठेवणे बंधनकारक राहणार आहे.
निवडणूक काळात मद्यविक्रीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, मतदान प्रक्रियेवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये आणि मतदारांना कोणत्याही प्रकारच्या दबावाशिवाय निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा,हा या निर्बंधांमागील प्रमुख उद्देश आहे.निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी संबंधित सर्व घटकांनी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येणार आहे.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या किंवा निर्धारित कालावधीत मद्यविक्री सुरू ठेवणाऱ्या संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 मधील कलम 54 व 56 मधील तरतुदींनुसार संबंधित अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाईदेखील करण्यात येऊ शकते. त्यामुळे सर्व संबंधित मद्यविक्री व ताडीविक्री अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाची गांभीर्याने नोंद घेऊन त्याचे काटेकोर पालन करावे,असे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट केले आहे.
मद्यविक्री बंदीचे वेळापत्रक
21 ऑक्टोबर 2026,बुधवार : दुपारी 4 वाजल्यापासून पुढे मद्यविक्री बंद.(मतदान संपण्यापूर्वीचे 48 तास),22 ऑक्टोबर 2026,गुरुवार : संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद.23 ऑक्टोबर 2026, शुक्रवार : मतदानाच्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत मद्यविक्री बंद.27 ऑक्टोबर 2026, मंगळवार : मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहील.
हा आदेश संपूर्ण धाराशिव जिल्ह्यास लागू राहणार असून,संबंधित सर्व अनुज्ञप्तीधारकांनी निर्धारित कालावधीत मद्यविक्री बंद ठेवून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.