धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. राष्ट्रीय गुणवता आश्वासन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून जिल्ह्यातील एकूण 78 आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रे आणि 23 प्राथमिक आरोग्य केंद्रे,अशा एकूण 101 आरोग्य संस्थांचे राज्य स्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पथकाद्वारे मूल्यांकन होऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने आरोग्य विभागाने हि महत्वाची व मोलाची कामगिरी केली आहे, अशी कामगिरी करणारा धाराशिव हा राज्यात एकमेव जिल्हा आहे. या कामगिरीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांचे योग्य नियोजन व त्यासाठीचा पाठपुरावा आहे.
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणे,रुग्णांना सुरक्षित व प्रभावी आरोग्य सेवा मिळवून देणे, तसेच आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ,औषधसाठा, उपकरणे, स्वच्छता,संसर्ग प्रतिबंध व विविध आजारावर नियंत्रण आणून रुग्णाभिमुख सेवा यांची गुणवत्ता सुनिश्चित करणे हा आहे.
या यशामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,डॉ. कुलदीप मिटकरी,डॉ.विनयशील कुलकर्णी,डॉ.मारुती कोरे, डॉ.सुशील चव्हाण,डॉ.पंकज शिनगारे,जीवन कुलकर्णी, किशोर गवळी,किशोर तांदळे तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी संबंधित आरोग्य संस्थांचे वैद्यकीय अधिकारी, उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी,परिचारिका, प्रयोगशाळा कर्मचारी,आशा स्वयंसेविका तसेच इतर सर्व अधिकारी-कर्मचायांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
