कळंब (प्रतिनिधी)- बालिकांच्या हक्कांचे संरक्षण, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि बालविवाहमुक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने युवा ग्राम विकास मंडळाच्या वतीने आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. तुळजाई प्रतिष्ठान, पानगाव अंतर्गत श्री ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय, येरमाळा रोड, कळंब येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. पी. जातभर, शिक्षक ए. ए. कोठावळे, शिपाई अंकुश गव्हाणे, रंजना उंदरे, बिट्टू चोंदे तसेच युवा ग्राम विकास मंडळाचे संतोष रेपे, प्रकाश काळे, सुनीता विभूते आणि नीता बहिर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित बालिकांना आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा देऊन बालिकांचे हक्क, शिक्षणाचे महत्त्व, लिंग समानता आणि मुलींना समान संधी मिळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बालविवाहाचे दुष्परिणाम, बाल लैंगिक शोषण, बालकामगार आणि बाल तस्करी यांसारख्या समस्यांविषयी माहिती देऊन त्यांना प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव दूर करणे, बालिकांचे आरोग्य, पोषण व सुरक्षितता सुनिश्चित करणे, त्यांना कायदेशीर हक्क व संरक्षणविषयक कायद्यांची माहिती देणे, तसेच मुलींचा आत्मविश्वास, स्वावलंबन आणि नेतृत्वगुण विकसित करणे यावर यावेळी भर देण्यात आला. प्रत्येक बालिकेला सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि भेदभावमुक्त वातावरण मिळावे, यासाठी कुटुंब, शाळा आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या देशव्यापी अलायन्सच्या मार्गदर्शनाखाली युवा ग्राम विकास मंडळानेया उपक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात एकूण 55 विद्यार्थी सहभागी झाले असून, त्यामध्ये 30 बालिका आणि 25 मुले उपस्थित होती. बालिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, त्यांच्यावरील अन्याय व भेदभाव रोखणे आणि सुरक्षित बालपणासाठी समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
