तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी यंदा दिवाळीपूर्वीच 25 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अदा करावे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने केली आहे. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांना हे अनुदान वेळेत देण्याची मागणी संघटनेने व्यवस्थापनाकडे पत्राद्वारे केली आहे.
संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके आणि केंद्रीय सरचिटणीस संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने तिन्ही वीज कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन पाठविण्यात आले आहे. मागील वर्षी सानुग्रह अनुदान वितरणास झालेल्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. यंदा अशा प्रकाराची पुनरावृत्ती टाळून दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर 25 हजार रुपये जमा करावेत, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
खाजगीकरणाच्या आव्हानातही कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे!
वीज क्षेत्रात खाजगीकरण, कंत्राटीकरण आणि वीज वितरण परवान्यांबाबतची आव्हाने उभी राहत असतानाही राज्यातील वीज कर्मचारी आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत. ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासोबतच शासकीय वीज उद्योगाचे अस्तित्व कायम राहावे, यासाठी सर्व श्रेणीतील कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे. तिन्ही वीज कंपन्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळविलेले विविध पुरस्कार आणि सन्मान हे कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचे फलित असल्याचे सांगत, त्यांच्या योगदानाची दखल व्यवस्थापनाने घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही अनुदानाचा लाभ द्या!
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसोबतच कंत्राटी कामगारही कठीण परिस्थितीत काम करतात. त्यामुळे सानुग्रह अनुदानाचा लाभ केवळ कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित न ठेवता कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात परस्पर विश्वास, सुसंवाद आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदानाची रक्कम अदा करून व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या श्रमांचा सन्मान करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने केले आहे.