भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील पाटसांगवी येथील पांडुरंग महिला शेतकरी गटाने सामूहिक शेतीच्या माध्यमातून एक वेगळीच प्रेरणादायी वाट निर्माण केली आहे. पाणी फाउंडेशन, उमेद अभियान आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026च्या पार्श्वभूमीवर या गटाची वाटचाल विशेष लक्षवेधी ठरत आहे.
सामूहिक शेती, आधुनिक तंत्रज्ञान, खर्चातील बचत, पर्यावरणपूरक शेती आणि सामाजिक बांधिलकी या पंचसूत्रीवर काम करत या 11 महिलांनी आपल्या गटाला केवळ शेती करणारा गट न ठेवता “शिकणारा, प्रयोग करणारा, बचत करणारा आणि इतरांना प्रेरणा देणारा महिला शेतकरी गट” म्हणून उभे केले आहे. 15 एकरांवर सामूहिक शेती; नियोजनबद्ध शेतीचा प्रयोग गटातील महिलांनी एकत्र येत तब्बल 15 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेऊन सामूहिक शेती सुरू केली आहे.शेतीतील प्रत्येक टप्पा नियोजनपूर्वक आणि प्रमाणे राबविण्यावर गटाचा भर आहे.निविष्ठा खरेदीपासून पेरणीपर्यंत, पिकांच्या व्यवस्थापनापासून काढणीपर्यंत आणि खर्चाच्या नियोजनापासून बचतीपर्यंतप्रत्येक निर्णय सामूहिक पद्धतीने घेतला जातो.
शेती एकत्र केली तर केवळ जमीन मोठी होत नाही; तर शेतकऱ्यांची ताकदही मोठी होते. या गटाच्या वाटचालीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सामूहिक खरेदी आणि इर्जीक पद्धतीचा प्रभावी वापर. एकत्रितपणे निविष्ठा खरेदी केल्यामुळे खर्चात लक्षणीय बचत झाली असून, आतापर्यंत जवळपास 2 लाखांच्या आसपास बचत झाल्याचे सांगण्यात आले आहे.ही बचत केवळ रुपयांची नाही; तर सामूहिक नियोजनाच्या शक्तीवर विश्वास वाढविणारी बचत आहे.आजच्या काळात शेतीतील वाढता उत्पादन खर्च हा मोठा प्रश्न असताना, “खर्च कमी करून निव्वळ उत्पन्न वाढविणे” या दिशेने पांडुरंग महिला शेतकरी गटाने घेतलेले पाऊल निश्चितच अभ्यासण्यासारखे आहे गटातील महिलांनी शेतीत विविध आधुनिक व पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब केला आहे.
