धाराशिव (प्रतिनिधी)- दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण होणारा मानसिक ताण-तणाव, शेतकरी व नागरिकांचे मानसिक आरोग्य तसेच आत्महत्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय धाराशिव व हॅलो मेडिकल फाउंडेशन, अणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद धाराशिव येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात 'दुष्काळातील ताण-तणावाशी सामना' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेस जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत बनसोडे, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार, डॉ. आशिष येपुरे व डॉ. महेश कानडे यांनी दुष्काळामुळे निर्माण होणारा मानसिक ताण, चिंता, नैराश्य, व्यसनाधीनता, कौटुंबिक वाद, एकटेपणा आणि आत्महत्येचा धोका याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी केले. जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दुष्काळग्रस्त नागरिकांशी संवाद साधताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता, संयम आणि आपलेपणा जपण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडदळकर यांनी ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील महत्त्वाचा दुवा असलेल्या आशा व गटप्रवर्तकांना नागरिकांशी, विशेषतः शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय पोतदार यांनी केले.
