धाराशिव (प्रतिनिधी)-  दुष्काळाचे संकट हे केवळ एका शेतकऱ्याचे,एका गावाचे किंवा एका विभागाचे नसून संपूर्ण समाजासमोरील आव्हान आहे.या संकटाचा सामना करण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील आहेच. मात्र समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या क्षमतेनुसार मदतीचा हात पुढे केला,तर दुष्काळाच्या झळा निश्चितच कमी करता येतील. जिल्ह्यात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थांकडे अनुभव,मनुष्यबळ आणि संसाधने उपलब्ध आहेत.या सर्व शक्ती एकत्र आल्यास बाहेरील मदतीवर पूर्णपणे अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.त्यामुळे ज्या संस्थेला ज्या क्षेत्रात काम करण्याची क्षमता आहे,त्या क्षेत्रात त्यांनी पुढाकार घ्यावा.दुष्काळाच्या काळात एकमेकांना मदत करण्याची तयारी आणि सामूहिक जबाबदारीची भावना अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. प्रियंवदा महाडदळकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, संकट मोठे असले तरी एकजुटीची ताकद त्याहून मोठी आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेती,पिण्याचे पाणी,पशुधनासाठी चारा आणि ग्रामीण जीवनमानावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत केवळ शासकीय उपाययोजनांवर अवलंबून न राहता समाजातील विविध संस्था,संघटना,उद्योग, बँका आणि नागरिकांनीही आपल्या परीने योगदान देणे गरजेचे आहे.  

बायफ संस्थेच्या प्रतिनिधींनी पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देणे,उपलब्ध चाऱ्यावर आवश्यक प्रक्रिया करून त्याचा उपयोग वाढविणे,पशुपालकांना मार्गदर्शन करणे तसेच पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी काम करण्याबाबत चर्चा केली.  दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि गावपातळीवरील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असून तालुकास्तरावरही स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 


 
Top