धाराशिव (प्रतिनिधी)-  नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ,पारदर्शक आणि वेळेत उपलब्ध करून देण्याचा संदेश देतानाच आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी धाराशिव शहरात सेवा संकल्प अभियानांतर्गत सायकल व ई-बाईक रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी  कीर्ती किरण पुजार यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.

जिल्हा प्रशासन,जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 7.30 वाजता या रॅलीचे आयोजन करण्यात आले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करणे, शासकीय सेवांविषयी जनजागृती करणे तसेच युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमामागील व्यापक उद्देश होता.

रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे,श्रीपतराव भोसले हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नावरे,शाळेतील सर्व क्रीडा शिक्षक,आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू अश्विनी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यामुळे नव्या पिढीकडून सामाजिक बांधिलकीचा संदेश या माध्यमातून गेला आहे. शालेय जीवनातच आरोग्य,पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत.  यशस्वी आयोजनासाठी क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे,अक्षय बिरादार, शुभांगी रोकडे, विश्वास खंदारे, डिंपल ठाकरे,जान्हवी पेठे,संपदा मोरे, किशोर भोकरे आणि सुरेश कळमकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. 


 
Top