धाराशिव  (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील संभाव्य चारा टंचाईवर मात करताना पशुधनाला सुरक्षित,पौष्टिक आणि किफायतशीर आहार उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक साधनसंपत्तीचा शास्त्रोक्त पद्धतीने वापर करण्याचा महत्त्वपूर्ण पुढाकार जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी 6 ऑक्टोबर रोजी पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांसमवेत ढोकी येथील साखर कारखान्याला प्रत्यक्ष भेट देऊन साखर निर्मितीतील उपउत्पादने असलेल्या बगॅस (उसाची चिपाडे) आणि मोलॅसिस (मळी) यावर योग्य प्रक्रिया करून त्यांचा जनावरांसाठी पूरक चारा म्हणून प्रभावी वापर करण्याच्या शक्यतांची सविस्तर पाहणी केली.

दुष्काळसदृश परिस्थितीत पशुपालकांसमोर जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो.अशा परिस्थितीत उपलब्ध स्थानिक संसाधनांचा शास्त्रीय आणि सुरक्षित पद्धतीने उपयोग झाल्यास पशुधन जगविण्यासह दुग्धोत्पादन टिकवून ठेवण्यासही मोठा आधार मिळू शकतो.या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांमधून उपलब्ध होणाऱ्या बगॅस आणि मोलॅसिसचा पशुखाद्यासाठी उपयोग करण्याच्या शक्यता प्रशासनाकडून तपासण्यात येत आहेत.केवळ कोरडा बगॅस जनावरांना पचण्यास कठीण असतो आणि त्यातून नगण्य पोषण मिळते.मात्र, पशुवैद्यकीय शास्त्रातील तंत्रज्ञानाचा आधार घेऊन त्यावर युरिया,मोलॅसिस व खनिज मिश्रणाची प्रक्रिया केल्यास त्यातील तंतुमय घटकांची पचनक्षमता लक्षणीयरीत्या वाढते.मोलॅसिसमुळे ऊर्जेची व चवीची पूर्तता होते,तर युरियामुळे प्रथिनांचे प्रमाण सुधारते.या तांत्रिक प्रक्रियेची प्रत्यक्ष व्यवहार्यता तपासण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कारखान्यातील बगॅस डेपो तसेच मोलॅसिस साठवणूक विभागाची बारकाईने पाहणी केली.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले.पशुसंवर्धन विभागाने ढोकी साखर कारखान्याशी समन्वय साधून बगॅस आणि मोलॅसिसवर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याचे एक मॉडेल तातडीने कार्यान्वित करावे.या प्रक्रियेतून तयार होणारा चारा पशुधनासाठी सुरक्षित आणि पोषणमूल्यांच्या दृष्टीने उपयुक्त असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्याची वैज्ञानिक पडताळणी करण्यावर विशेष भर देण्यात यावा,असे श्री . पुजार यांनी स्पष्ट केले.

प्रक्रिया केलेल्या चाऱ्यातील पचनक्षमता,पोषणमूल्ये विशेषतः टीडीएन, क्रूड प्रोटीनतसेच विषबाधा प्रतिबंधक मानकांची जिल्हा व विभागीय पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून काटेकोर तपासणी करून घ्यावी.आवश्यक सुरक्षितता आणि गुणवत्ता निश्चित झाल्यानंतरच त्याचा पशुपालकांसाठी व्यापक वापर करण्याच्या दृष्टीने पुढील नियोजन करावे,असे निर्देश देण्यात आले.

या तंत्रज्ञानाचा लाभ केवळ कारखाना अथवा प्रशासकीय पातळीपुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष पशुपालकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.पशुपालकांना आपल्या शेतावरच उपलब्ध बगॅस व मळीवर सोप्या पद्धतीने प्रक्रिया करता यावी,यासाठी पशुसंवर्धन विभागाने ग्रामपातळीवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आयोजित करावीत. प्रक्रियेची योग्य पद्धत,प्रमाण, सुरक्षितता आणि पशुधनाला देण्याची पद्धत याबाबत जनजागृती करावी,असेही जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी सांगितले.

चारा टंचाईच्या काळात पशुपालकांना बगॅस आणि मोलॅसिस माफक व नियंत्रित दरात उपलब्ध व्हावे,यासाठी साखर कारखान्यासोबत आतापासूनच पूर्वतयारीचे धोरण निश्चित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.उपलब्ध साधनसंपत्ती, त्याची गरज,वाहतूक,साठवणूक आणि पशुपालकांपर्यंत सुलभ पुरवठा या सर्व बाबींचा विचार करून नियोजन करण्यावर भर देण्यात आला.

चारा टंचाईच्या काळात पशुधन जगवणे आणि दुग्धोत्पादन टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.साखर कारखान्यातील बगॅस आणि मळीचा शास्त्रीय पद्धतीने वापर केल्यास स्थानिक पातळीवरच शाश्वत व स्वस्त चारा उपलब्ध होईल,असे जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी यावेळी सांगितले. चारा टंचाईच्या संभाव्य संकटाला सामोरे जाताना उपलब्ध स्थानिक संसाधनांकडे केवळ उपउत्पादन म्हणून न पाहता त्यांचे पशुधनासाठी उपयुक्त साधनात रूपांतर करण्याचा हा प्रयत्न आहे. शास्त्रोक्त प्रक्रिया,सुरक्षिततेची प्रयोगशाळेत खात्री आणि हे तंत्रज्ञान थेट पशुपालकांपर्यंत पोहोचविण्याची सांगड यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील पशुपालकांना चारा टंचाईच्या काळात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.मुळे,सहाय्यक आयुक्त,पशुधन विकास अधिकारी तसेच साखर कारखान्याचे समन्वयक उपस्थित होते.

 
Top