धाराशिव  (प्रतिनिधी)- महसूल विभागातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र प्रकरणे परस्पर संमतीने आणि सामोपचाराने निकाली काढून पक्षकारांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाचविण्यासाठी ‌‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बुधवार,14 ऑक्टोबर 2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, उमरगा येथे महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने व सामोपचाराने निपटारा करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. महसूल विभागातील प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे संबंधित पक्षकारांचा वेळ,श्रम आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणावर होतो.त्यामुळे पक्षकारांची परस्पर संमती आणि तडजोडीच्या माध्यमातून वाद मिटवून प्रकरणे जलदगतीने निकाली काढणे,हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या निर्देशानुसार आणि अपर जिल्हाधिकारी श्रीमती.ज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 14 ऑक्टोबर 2026 रोजी बुधवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय,उमरगा येथे महसूल लोकअदालत होणार आहे.


तडजोडीस पात्र प्रकरणांचा समावेश

उपविभागीय अधिकारी,उमरगा यांच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या तडजोडीस पात्र महसूलविषयक प्रकरणांचाही या महसूल लोकअदालतीमध्ये समावेश करण्यात येणार आहे.त्यामुळे संबंधित स्तरावर प्रलंबित प्रकरणांतील पक्षकारांनी परस्पर संमतीने आणि सामोपचाराने आपले वाद मिटविण्यासाठी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

उमरगा उपविभागातील तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या ज्या प्रकरणांमध्ये पक्षकारांच्या परस्पर संमतीने तडजोड होऊ शकते,अशी प्रकरणेही महसूल लोकअदालतीमध्ये घेण्यात यावीत, असे उपविभागीय अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

संबंधित पक्षकारांची आपल्या प्रकरणातील वाद सामोपचाराने मिटविण्याची तयारी असल्यास त्यांनी संबंधित तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.आपले प्रकरण महसूल लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी सादर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.दोन्ही पक्षकारांची संमती असल्यास प्रकरणाच्या स्वरूपानुसार नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून त्याचा निपटारा करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी,उमरगा यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या तडजोडीस पात्र प्रकरणांतील पक्षकारांनीही महसूल लोकअदालतीचा लाभ घेत आपली प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महसूल लोकअदालतीमध्ये अधिकाधिक प्रकरणे तडजोडीसाठी यावीत,यासाठी उपविभागीय अधिकारी स्तरावर जिल्हा वकील मंडळाची बैठक घेण्यात आली आहे.या बैठकीत लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्याबाबत विधिज्ञ मंडळींनाही आवाहन करण्यात आले आहे.

14 ऑक्टोबर 2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, उमरगा येथे होणाऱ्या महसूल लोकअदालतीत उपविभागीय अधिकारी स्तरावरील तडजोडीस पात्र प्रकरणे घेऊन ती संबंधित पक्षकारांच्या परस्पर संमतीने निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.


वेळ आणि खर्चाची होणार बचत

महसुली वाद न्यायालयीन प्रक्रियेत दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यास पक्षकारांना वारंवार कार्यालयात जावे लागते.त्यासाठी वेळ,श्रम आणि पैसा खर्च होतो.मात्र,दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेतल्यास लोकअदालतीच्या माध्यमातून वादाला लवकर पूर्णविराम मिळू शकतो. त्यामुळे पक्षकारांना दिलासा मिळण्याबरोबरच महसूल न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होण्यासही हातभार लागणार आहे. त्यामुळे उमरगा उपविभागातील उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या तडजोडीस पात्र प्रकरणांतील सर्व संबंधित पक्षकारांनी परस्पर संमतीने व सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेऊन महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन उपविभागीय अधिकारी, उमरगा दत्तू शेवाळे यांनी केले आहे.


 
Top