धाराशिव (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात तुळजापूर येथे राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने शहरातील विद्युत व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.महोत्सव कालावधीत तुळजापूर नगर परिषद आस्थापनांचा विद्युत पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही,याची दक्षता घेण्यासह 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दि.11 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2026 या कालावधीत साजरा होणार आहे.या काळात राज्याच्या विविध भागांसह परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे दाखल होणार असून भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता विद्युत व्यवस्थेबाबत आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत तुळजापूर नगर परिषद आस्थापनांचा विद्युत पुरवठा अखंडित राहील,याची विशेष दक्षता घेण्यात यावी.अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यास मोठ्या गर्दीच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक पूर्वनियोजन करावे. विद्युत व्यवस्थेसंदर्भातील नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात यावा.तसेच संबंधित अधिकारी आणि वायरमन हेही 24 तास उपलब्ध राहतील,अशा पद्धतीने नियोजन करून त्यांची नियुक्ती करण्यात यावी. असे निर्देश देण्यात आले आहेत.


 
Top