धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेती आणि शेतीशी निगडित व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. याचा परिणाम शेतकरी, व्यापारी, छोटे-मोठे उद्योजक यांच्यासह ग्रामीण भागातील स्थानिक कलावंत आणि लोककलावंतांच्या उदरनिर्वाहावरही झाला आहे. अशा संकटाच्या काळात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्थानिक कलावंतांना आर्थिक आधाराची संधी उपलब्ध करून देत त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल शिंगाडे यांनी केली आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्याबाबत शिंगाडे यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केले आहे. धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. यंदाच्या तीव्र दुष्काळामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असून, शेतीशी संबंधित व्यवसायांमधील आर्थिक उलाढालीवरही परिणाम झाला आहे. याची झळ ग्रामीण भागातील लोककलावंत, गायक, वादक, नर्तक, नाट्यकलावंत आणि इतर सांस्कृतिक क्षेत्रांतील कलाकारांना बसत आहे. अनेक कलावंत शेतीमजुरी किंवा पूरक व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, दुष्काळामुळे उत्पन्नाची साधने मर्यादित झाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या निवेदनावर विशाल शिंगाडे यांच्यासह आकाश वाघमारे, सुहास झेंडे, सुगत सोनवणे, अविनाश बनसोडे, ताहेर शेख, विजय उंबरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.