धाराशिव (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच त्यांच्या कार्यकाळात ‌‘सेवा परमो धर्मः' या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यात ‌‘सेवा संकल्प अभियान' राबविण्यात येत आहे.

या अभियानाच्या अनुषंगाने धाराशिव शहरात जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार,8 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता सायकल व ई-बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी तसेच विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत.सुमारे एक हजार विद्यार्थी,अधिकारी व कर्मचारी या रॅलीत सहभाग नोंदविणार आहेत.


जिल्हाधिकारी कार्यालयातून रॅलीला प्रारंभ

सायकल व ई-बाईक रॅलीला जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथून प्रारंभ होणार आहे.तेथून प्रशासकीय इमारत,महात्मा बसवेश्वर चौक,माणिक चौक, पोलीस अधीक्षक कार्यालयमार्गे मध्यवर्ती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आयोजित या सायकल रॅलीमध्ये धाराशिव शहरातील युवक-युवती, खेळाडू,सायकलप्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांनी केले आहे.

सेवा,समर्पण आणि नागरिक सहभागाचा संदेश


‌‘सेवा,समर्पण आणि नागरिक सहभागातून सशक्त भारताच्या निर्मितीसाठी चला,सायकल रॅलीत सहभागी होऊया ! असा संदेश देत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने नागरिकांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


 
Top