धाराशिव (प्रतिनिधी)- मागील दोन दिवसांत आमदार रोहित पवार यांनी संपूर्ण मराठवाड्यातील विविध भागांत दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व शेतमजुरांशी संवाद साधला. यावेळी खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात हातातून गेल्याचे तसेच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. रखडलेला पीकविमा तातडीने वितरित करावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी तसेच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची तातडीची मदत देण्यात यावी. त्याचबरोबर शेतीतील कामे ठप्प झाल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेल्या शेतमजुरांनाही प्रत कुटुंब 25 हजारांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि वाढते आर्थिक संकट यामुळे ग्रामीण जनजीवनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन मदतीच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे( शरदचंद्र पवार ) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील मा.आ. संजय वाकचौरे, विश्वजीत चव्हाण, राजेंद्र म्हस्के, पंकज नाना बोराडे, पांडुरंग तांगडे पाटील, संजय काळभांडे, भीमराव हत्तीअंबीरे, कपिल आकात, संजय शेटे, अजय गव्हाणे, आशिष पवार, शेखर घोडके, प्रवीण साळुंके यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
