धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धाराशिव च्या  फार्मसी विभागाचा विद्यार्थी वैभव गुंजाळ याची ओमेगा हेल्थकेअर, बेंगलोर या नामांकित कंपनीत ”क्लिनिकल कोडर या पदावर निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने यांनी वैभव गुंजाळ याचे अभिनंदन करून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांना उद्योग विश्वातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या इंटर्नशिप व इंडस्ट्री-रडी प्रशिक्षण कार्यक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

महाविद्यालयाने विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत केलेल्या सामंजस्य करारांमुळे  विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध होत आहेत. विशेषतः मेडिकल कोडिंग आणि फार्माकोव्हिजिलन्स इंटर्नशिप प्रोग्राममुळे विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील आधुनिक औद्योगिक कार्यपद्धती, आवश्यक कौशल्ये आणि व्यावसायिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळत असून, त्याचा विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये मोठा फायदा होत आहे. या प्रशिक्षणाचा कु.वैभव गुंजाल याच्या ओमेगा हेल्थ केअर कंपनीमध्ये निवडीसाठी विशेष उपयोग झाला.

विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, शिस्त, सातत्य, प्रभावी संवादकौशल्ये म्हणजेच सॉफ्ट स्किल्स, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन हे त्यांच्या यशाचे प्रमुख घटक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक औद्योगिक क्षेत्रात यशस्वी करिअर घडविता येते, हे कु. वैभव गुंजाळ  याच्या यशातून अधोरेखित झाले आहे. या निवडीसाठी महाविद्यालयाचे प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. जी. बी. चिवटे आणि प्रा. अशोक जगताप यांनी  वैभव गुंजाळ याला विशेष मार्गदर्शन केले. तसेच प्रा. एन. एन. नाईकवाडी यांनीही निवड प्रक्रियेदरम्यान मोलाची मदत व मार्गदर्शन केले.

फार्मसी विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध इंटर्नशिप व उद्योगाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांचे समन्वयन फार्मसी विभागप्रमुख डॉ. प्रीती माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबतच उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक व्यावहारिक ज्ञान, तांत्रिक कौशल्ये आणि रोजगाराभिमुख क्षमता विकसित करण्यावर विभागाचा विशेष भर आहे.

वैभव गुंजाळ याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, महाराष्ट्र शासनाच्या मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील, संस्थेचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, सर्व विभागप्रमुख, विभागातील सर्व प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यांनी मनापासून अभिनंदन केले. त्याच्या ही निवड फार्मसी विभागातील इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे.

 
Top