धाराशिव (प्रतिनिधी)- विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नोंदींची पडताळणी व अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केवळ मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, एवढीच माहिती तपासून न थांबता मतदार क्रमांक, भाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव आणि मतदान केंद्राचे ठिकाण याचीही खात्री करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले आहे.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र शोधताना होणारी धावपळ टाळण्यासाठी मतदारांनी मतदानापूर्वीच आपल्या मतदान केंद्राची माहिती तपासून ठेवावी. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच Voter Helpline / ECINET App वर मतदारांना आपले नाव आणि मतदान केंद्राची माहिती तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे.
एसआयआर अंतर्गत मतदार नोंदींची पडताळणी
विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान दुबार नोंदी, स्थलांतरित, मृत मतदार तसेच विसंगती असलेल्या मतदार नोंदींची पडताळणी करण्यात येत आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र नागरिकांना दावे व हरकती नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये काही त्रुटी आढळल्यास नागरिकांनी संबंधित बीएलओ, तहसील कार्यालय किंवा निवडणूक विभागाशी संपर्क साधावा.
मतदार यादीत नाव कसे तपासाल?
मतदारांनी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा Voter Helpline / ECINET App वर आपला EPIC क्रमांक अथवा आवश्यक माहिती टाकून मतदार यादीतील नाव तपासावे. त्याचबरोबर आपला भाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव आणि ठिकाण याचीही खात्री करावी.
नाव आहे; पण मतदान केंद्राची माहिती तपासली का?
मतदार यादीत नाव कायम असले तरी मतदान केंद्राची माहिती तपासणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी आपल्या पूर्वीच्या केंद्रावर जाण्यापूर्वी अधिकृत माध्यमातून नवीन मतदान केंद्राची माहिती पडताळून पाहावी.
नाव नसल्यास काय करावे?
पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत नसल्यास फॉर्म 6 द्वारे नवीन मतदार नोंदणी करता येते. तसेच पत्ता किंवा मतदार यादीतील तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म 8 द्वारे अर्ज करता येतो.
बीएलओशी संपर्क साधण्याचे आवाहन
मतदारांनी आपल्या भागातील BLO यांच्याशी संपर्क साधून मतदार यादीतील आपली नोंद अद्ययावत आहे का, याची खात्री करून घ्यावी. मतदारांनी केवळ यादीत नाव आहे का, हे न पाहता आपला भाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव आणि ठिकाण याचीही खात्री करावी. मतदार यादीतील नोंद अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी संबंधित बीएलओशी संपर्क साधावा.