धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील गंभीर पाण्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उजनी धरणातून धाराशिव जिल्ह्यासाठी 1 टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. करजखेडा येथील पाहणी दरम्यान मुख्यमंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पूर्णतः कोरडा असलेला पाटबंधारे तलाव दाखवत  जिल्ह्यातील पाण्याची भीषण परिस्थिती मांडली होती व उजनी धरणातून 1 टीएमसी पाणी रामदरा तलावात आणण्याबाबत विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी याची तातडीने दखल घेतल्याने धाराशिवच्या पाणीप्रश्ना बाबत दिलासा मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंहए पाटील यांनी व्यक्त केला आहे.

धाराशिव जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली आहे. विविध जलप्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा फक्त 8 % आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह पशुधनासाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आतापासूनच पाणीसाठा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे उजनी धरणातील पाणी धाराशिवसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती  केली होती. उजनी धरणातून भीमा-सीना बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडून घाटणे बॅरेजच्या माध्यमातून रामदरा तलाव भरण्याचे नियोजन आहे.

मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी 23 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट करत उजनीतील पाणी धाराशिवसाठी आरक्षित करण्याबाबत सोलापूर जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट निर्देश दिले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे उजनीतील एक टीएमसी पाणी गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मातेच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात दाखल होण्याचा मार्ग आता आणखी सुकर झाला असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.


कृष्णा-मराठवाडा प्रकल्पालाही चालना

उजनीचे पाणी धाराशिवपर्यंत आणण्यासाठी सुरू असलेल्या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चाचणी घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे उजनीतील पाणी भीमा-सीना बोगद्याच्या माध्यमातून धाराशिवकडे वळविण्याच्या प्रक्रियेला या निर्णयामुळे मोठी चालना मिळणार आहे. रामदरा, सिंदफळ आणि पांगरदरवाडी या तलावांमध्ये पाणी उपलब्ध झाल्यास दुष्काळी काळात पिण्याचे पाणी तसेच पशुधनासाठी आवश्यक पाण्याचा मुबलक उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या दृष्टीने प्रशासनालाही काही प्रमाणात नियोजन करण्यास सहकार्य होणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.


 
Top