परंडा (प्रतिनिधी)- हंसराज गणेश मंडळाच्या वतीने सोमवारी (दि.२१) रोजी आयोजित मुद्रांक व नाणे संग्रह प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते विश्वजीत पाटील, प्रा.डॉ.सचिन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे बार्शी येथील उदयकुमार पोतदार यांनी अनेक वर्षांच्या प्रयत्नातून जतन केलेला दुर्मिळ नाणी व मुद्रांकांचा अनोखा संग्रह. त्यांच्या या संग्रहामध्ये भारतीय इतिहास, संस्कृती आणि विविध कालखंडांशी संबंधित अनेक दुर्मिळ नाणी व विविध प्रकारचे मुद्रांक पाहण्याची संधी उपस्थित विद्यार्थ्यांना मिळाली.उदयकुमार पोतदार यांनी स्वतः या संग्रहाचे प्रदर्शन मांडून उपस्थितांना त्यामागील इतिहास, वैशिष्ट्ये व संग्रहाबाबत मार्गदर्शन केले.त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदातून इतिहास आणि संस्कृती जतन करण्याचा संदेश मिळाला. प्रदर्शनाला विद्यार्थी, इतिहासप्रेमी, नागरिक, गणेशभक्त तसेच हंसराज गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समर्थ कुळधर्मे यांनी केले.

 
Top