परंडा (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यात पावासाळी हंगामात सरासरी पेक्षा अत्यल्प आणि पावसात मोठे खंड पडल्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, तुर, उडीद, मुग इत्यादी सर्वच पिके वाया गेले आहेत. निसर्गाचा लहरीपणा, बदलते हवामान आणि गतवर्षी झालेली अतिवृष्टी व महापूर यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळी जाहीर करून भरीव मदतीचे पॅकेज शेतकऱ्यांना देण्याची मागणी भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील परंडा, भूम, वाशी, तुळजापुर, धाराशिव, कळंब, उमरगा व लोहारा या आठही तालुक्यात खरीप हंगाम 2026 मध्ये एकुण 5,39,027 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असुन त्यापैकी सर्वाधिक सोयाबीन 4,67,322 हेक्टर (86.70%), तुर 34,831 हेक्टर (6.64%), उडीद 21,886 हेक्टर (4.06%) व मुग 5,544 हेक्टर (1.03%) इतकी पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यात यावर्षीच्या पावसाळ्यात जुन महिण्यात 22 दिवस, जुलै महिण्यात 12 दिवस, ऑगस्ट महिण्यात 25 ते 30 दिवस व सब्टेंबर महिष्यात 19 दिवसाचा पर्जन्य खंड पडला असुन जुन ते सब्टेंबर या काळात जिल्ह्यात जवळपास 90 दिवसाहून अधिक पर्जन्य खंड पडला आहे. 

धाराशिव जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु असे 225 प्रकल्प असुन या प्रकल्पांची एकुण पाणी साठा क्षमता 725.40 द.ल.घ.मी. इतकी आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पांमध्ये पावसाळा संपत आला असतानाही केवळ 8% इतका अत्यल्प पाणी साठा असुन शेतकऱ्यांना आत्ताच पाणी टंचाईच्या तिव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील सब्टेंबर 2026 मध्ये सरासरी पाणी पातळी 9.53 मी. असुन मागील 5 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत 07.02 मीटरने खालावली आहे. चारा छावण्या, टँकर व रोहयोची कामे त्याप्रमाणे शैक्षणिक शुल्क माफ करणे, विविध सवलती आदी मागण्या ठाकूर यांनी निवेदनात मांडल्या आहेत. 


 
Top