उमरगा (प्रतिनिधी)- दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने उमरगा शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. ट्रॅक्टर, बैलगाडीसह हजारो शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने शहर दणाणून गेले. उमरग्याच्या इतिहासातील मोठ्या मोर्चांपैकी एक ठरलेल्या या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला.
धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारकापासून मोर्चाला सुरुवात झाली. हातात फलक, विविध मागण्यांच्या घोषणा आणि ट्रॅक्टरच्या ताफ्यासह शेतकरी तहसील कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाले. मोर्चात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, शहराध्यक्ष विजय दळगडे, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, नगरपालिका सभापती विशाल काणेकर, बाबा मस्के, इरफान शेख, बाबा औटी, अभिजीत मोरे, पंचायत समिती सदस्य रविंद्र सोशल मीडिया सेलचे अमित रेड्डी, अभिषेक औरादे, दादासाहेब गायकवाड, आदर्श कोतीबिरे, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, रखडलेला पीकविमा तातडीने मंजूर करावा, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, तसेच शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. तहसील कार्यालयावर धडकलेल्या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा प्रशासनासमोर मांडत शासनाच्या धोरणांवर जोरदार टीका केली.

