तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात पावसाने पुरती पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण क्षेत्र भीषण कोरड्या दुष्काळाच्या सावटाखाली आले असल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करीत रविंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात आला, राज्य सरकार व प्रशासन पूर्णपणे उदासीन असून शेतकऱ्यांपर्यंत कोणतीही प्रत्यक्ष मदत पोहोचलेली नाही. शासनाच्या या शेतकरीविरोधी धोरणामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून आत्महत्येच्या उंबरठ्यावर फेकला गेला आहे.
शासनाच्या या नाकर्तेपणाविरुद्ध तुळजापूर येथे जुने बसस्थानकासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रविंद्र भिमाशंकर इंगळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी धाराशिव जिल्ह्याला तात्काळ 'कोरडा दुष्काळग्रस्त क्षेत्र' घोषित करण्यात यावे.बाधित शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी 1 लाख रुपये सानुग्रह अनुदान व पीक विमा मंजूर करावा.सर्व राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांची शेतकरी कर्जे पूर्णपणे माफ करून सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबवावी.शेती पंपाला 24 तास अखंडित वीज पुरवठा करावा.
प्रत्येक तालुक्यात जनावरांसाठी मोफत चारा छावण्या व टँकरद्वारे पिण्याचे पाणी सुरू करावे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे.शासनाने या निवेदनाची आठ दिवसांत गांभीर्याने दखल न घेतल्यास आणि हेक्टरी 1 लाख रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर न केल्यास संपूर्ण जिल्ह्यात यापेक्षाही तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा रविंद्र इंगळे यांनी सरकारला दिला आहे. यावेळी आंदोलनामधे मराठवाडा अध्यक्ष रविंद्र इंगळे,धनाजी पेदे,रघुनाथ भोजने,राजाभाऊ ढाके,शहाजी सोमवंशी,मकबुल मुल्ला,अक्षय साळुंके,अर्जुन बिरजदार,बळीराम जाधवर, विजय शिरसाट,संजोग भोसले,संजय नाना शितोळे,चंद्रकांत साळुंके,मंटु कदम,अरूण शेळके,विकास माळी,प्रकाश विकास माळी,रमेश गाडे,निलेश गाडे,नाना साळुंके,किशोर गंगाने,संतोष भोजने,विकास आवताडे,सुरेश कोळगे,प्रविण कदम,विकी परदेशी,सतीश डाके यांचेसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
