वाशी (प्रतिनिधी)-  तालुक्यातील इंदापूर येथे इंद्रेश्वर दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. यंदाही हलगी, ढोल, ताशा, सनई आणि ढोलकीच्या ठेक्यावर लेझीम खेळत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम इंद्रेश्वर दहीहंडी उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद चिलवंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच अध्यक्ष सिद्धेश्वर गवळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला इंदापूर येथे यंदा पारंपरिक संस्कृतीची अनोखी किनार लाभली. ना डीजे, ना डॉल्बी, तर लेझीमच्या तालावर तरुणांनी विविध कसरती आणि आकर्षक डाव साद करत उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण गावातील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले होते.

आजच्या काळात दहीहंडी व इतर सण-उत्सवांमध्ये डीजे आणि डॉल्बीच्या मोठ्या आवाजाचा वापर वाढत असताना इंदापूर गावाने मात्र पारंपरिकतेची वाट कायम ठेवली आहे. कर्णकर्कश आवाजाला फाटा देत पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याची ही परंपरा गावाने जपली आहे.

लेझीमचा डाव पाहण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले होते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या उत्सवाचा उत्स्फूर्त आनंद घेतला. गावातील युवकांनी पारंपरिक संस्कृती आणि लेझीमची ही परंपरा पुढील पिढीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष हनुमंत कोळी, सुरेश कोळी, संदीप चिवडे, विराज पारडे, गोविंद चिलवंत, पृथ्वीराज पाटील, उमेश गपाट, विशाल गपाट, गणेश पारडे, सुजित पारडे, किसन कोळी, प्रतीक पारडे, अमर पारडे, प्रभाकर माळी, सुजित कोळी, शुभम गपाट तसेच इंद्रेश्वर मंडळाच्या युवकांनी परिश्रम घेतले. दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत आणि ध्वनिप्रदूषणाला फाटा देत लेझीमच्या तालावर साजरा झालेला इंदापूरचा दहीहंडी उत्सव परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

 
Top