धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात 1988 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा नुकताच  अत्यंत उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर संपूर्ण कॅम्पसचा फेरफटका मारून त्यांनी विद्यार्थीदशेतील आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन व गणेशवंदनेने झाली. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “माजी ग्रहमंत्री डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या महाविद्यालयाची स्थापना केली. त्याच परंपरेने आज धाराशिवसह देशभरातील विद्यार्थी जगभरात उत्तम कामगिरी करत आहेत.”

तसेच, सध्या महाविद्यालयात राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम, रोजगार मेळावे, आणि गुणवत्ता वाढीचे प्रयत्न यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. या सर्व उपक्रमांना महाराष्ट्र शासनाच्या 'मित्रा' संस्थेच्या उपाध्यक्ष व तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील व  विश्वस्त  मल्हारदादा पाटील यांचे सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

या मेळाव्याला विनय भारद्वाज, मन्नू कालरा, व्ही. रविकांत, संदीप गुप्ता, पंकज गोयल, परवीन महाजन, संदीप लाहोटी, अमन सांगरा आणि मनीष वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.

माजी विद्यार्थ्यांनी सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर संधी, योग्य पूर्वतयारी, व उद्योगातील बदलत्या गरजा याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. विशेषतः ‌‘एआय'  मुळे नोकऱ्या जाणार नसून, त्याउलट नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड  टेलिकमुनिकेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स यांसारख्या आधुनिक शाखांमधील वाढत्या संधींविषयी त्यांनी सखोल माहिती दिली. त्याचबरोबर महाविद्यालयाने सुरू केलेल्या ड्रोन प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुक कौतुक केले.भविष्यात ड्रोन टेक्नोलॉजी चे महत्व भविष्यातील महत्त्व पटवून देत  आपल्या  महाविद्यालयातील सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या उपलब्ध नक्की होतील असाही विश्वास व्यक्त केला.

मेळाव्यात अंत्याक्षरी, गायन, नृत्य यांसारख्या विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये माजी व सध्याच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते परिसर सुशोभीकरणासाठी वृक्षारोपण करण्यात आले, तसेच वृक्षसंवर्धनाचा महत्त्वाचा संदेशही दिला गेला.

तसेच, महाविद्यालयाच्या ‌‘रेडिओ तेरणा' या स्वयंस्फूर्ती केंद्रावर माजी विद्यार्थ्यांच्या मुलाखतींचे विशेष आयोजन करण्यात आले होते.

माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील ड्रोन सेंटरला भेट दिली व संपूर्ण कॅम्पसचा फेरफटका मारला. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागप्रमुख, विविध समित्यांचे सदस्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा मुंडे यांनी केले, तर आभार प्रा. बी. एस. चव्हाण यांनी मानले.

 
Top