तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण अमावस्येनिमित्त बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त दोन मठांचे तसेच कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे मानाचे बैल कमानवेस येथील डुल्या मारुती मंदिरापासून वाजत-गाजत श्री तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आले.

कमानवेस येथील डुल्या मारुती मंदिरात महंत तुकोजीबुवा, चिलोजीबुवा व भोपे पाटील यांचे मानाचे बैल आणण्यात आले. याठिकाणी बैलांना पारंपरिक पद्धतीने सजविण्यात आले. त्यानंतर वाजत-गाजत हे बैल श्री तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आले. मंदिरात मानाच्या बैलांना पारंपरिक प्रथेप्रमाणे श्री तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात नेऊन देवीचे दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर बैलांचे विधिवत पूजन करून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात आला.

यावेळी उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) रामेश्वर वाले, महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top