धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण, महाविद्यालयीन प्रवेश, शिष्यवृत्ती तसेच विविध शैक्षणिक प्रक्रियांसाठी जात वैधता प्रमाणपत्र (व्हॅलिडीटी) आवश्यक असते. मात्र, जात वैधता प्रमाणपत्राच्या कामकाजासाठी सध्या एकाच अधिकाऱ्यावर एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचा कार्यभार असल्याने धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र प्रक्रियेला विलंब होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

या विलंबामुळे विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसून त्यांच्या प्रवेश प्रक्रियेसह शिष्यवृत्ती आणि पुढील शैक्षणिक संधींवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थी व पालकांना प्रमाणपत्राच्या कामासाठी वारंवार संबंधित कार्यालयात जावे लागत असूनही अपेक्षित वेळेत मार्गदर्शन व कार्यवाही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी धाराशिव जिल्ह्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राच्या कामकाजाकरिता स्वतंत्र पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा, तसेच कार्यालयासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत होणारा विलंब हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर विषय आहे. विशेषतः प्रवेशाच्या अंतिम मुदती, शिष्यवृत्ती अर्ज आणि विविध शासकीय योजनांसाठी प्रमाणपत्र आवश्यक असल्याने प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. स्वतंत्र अधिकारी व पुरेसे कर्मचारी उपलब्ध झाल्यास प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद होऊन विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाशी समन्वय साधून धाराशिव जिल्ह्यासाठी स्वतंत्र पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी आणि विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली.


 
Top