धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात हिंदी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने 14 ते 28 सप्टेंबर 2026 या कालावधीत हिंदी पंधरवडा साजरा करण्यात आला. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा,कथा लेखन,भित्तिपत्रिका, देशभक्तीपर गीत गायन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पंधरवड्याच्या समापनाप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ अशोक मर्डे, हिंदी विभाग प्रमुख , यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर यांनी वरील प्रतिपादन केले.

 ते म्हणाले की, स्वतंत्र संग्रामात हिंदी भाषेने देशाची एक वज्रमूठ बांधली, संपूर्ण भारत देश एक झाला व ब्रिटीशांच्या सत्तेचा विरोध केला.परस्पर संवादासाठी हिंदी भाषा एक उत्तम पर्याय आहे. भाषा विकासाच्या प्रक्रियेत समाज देखील विकसित होत असतो,केवळ हिंदी भाषाच नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी मातृभाषेव्यतिरीक्त अन्य भाषेचे ज्ञान आत्मसात करावे. शब्द साठा वाढला की उत्तम भाषा ज्ञान प्राप्त होते. अनेक शब्द स्विकारले की भाषा विकसित होत असते आणि भाषा जिवंत रहाते ए. आय तंत्रज्ञानाच्या काळात आपण अचेतन मनाकडे वळणे गरजेचे आहे असे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.

विभाग प्रमुख डॉ केशव क्षीरसागर म्हणाले की,आभासी विश्वात रमणारी पिढी विचार न करता निर्णय घेत आहे,हे समाजासाठी घातक आहे. नवनवीन जाहीराती दररोज आपल्या समोर आहेत. काय स्विकारावे यासाठी विचार करणे गरजेचे आहे. वैचारिक दृष्ट्या भाषेचा स्विकार केला की विचार विकसित होत असतात. त्यासाठी पुस्तके वाचावी लागतील असा संदेश डॉ.क्षीरसागर यांनी यावेळी दिला. 

याप्रसंगी विविध स्पर्धां मध्ये प्रथम तिन आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले. यावेळी प्र.प्राचार्य डॉ.सी. आर. दापके यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए.के मंजुळकर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला. सूत्रसंचालन डॉ.शीतल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार डॉ.राणूबाई कोरे यांनी मानले.

 
Top