भूम (प्रतिनिधी)-  दिव्यांग शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांचे थकीत पीक कर्ज माफ करावे. तसेच कर्जावरील व्याज व दंडात्मक व्याज माफ करून त्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. दिव्यांगत्वामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीची मशागत, पेरणी, कापणी, औषध फवारणी यासह विविध कामांसाठी मजूर व यंत्रसामग्रीवर अतिरिक्त खर्च करावा लागतो. त्यातच नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, बाजारभावातील चढ-उतार आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतीचे उत्पन्न घटत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या परिस्थितीत दिव्यांग शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करणे कठीण होत असून त्यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा निर्माण झाला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील पात्र दिव्यांग शेतकऱ्यांचे थकीत पीक कर्ज माफ करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. दिव्यांग शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पीक कर्जमाफी योजना लागू करावी, तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या दिव्यांग शेतकऱ्यांना कर्जमाफीसह विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके, सचिव रियाज पठाण, भूम तालुका अध्यक्ष हनुमंत बोराडे आणि विठ्ठल शिंदे उपस्थित होते.

 
Top