धाराशिव (प्रतिनिधी)- मी स्वतः एका मोठ्या मल्टीस्टेट बँकेचा संचालक आहे आणि अनेक सहकारी संस्थांच्या कार्यक्रमात मी नेहमी सहभागी असतो.परंतु प्रगती पतसंस्थेचे सभासद एवढ्या मोठ्या प्रमाणात संस्थेच्या कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवतात आणि आपल्या संस्थेबद्दल त्यांच्यामध्ये जी आत्मीयता आहे ती मी इतरत्र कुठेही पाहिलेले नाही अशा शब्दात राजेश पवार यांनी संस्थेचा गौरव केला.सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक तथा सुप्रसिद्ध व्ही.आर. पवार साडी सेंटरचे मालक राजेश पवार हे प्रगती पतसंस्थेच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळे संस्थेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी जमा होत आहेत परंतु संचालक मंडळांने नियमाचे पालन करून ठेवी आणि कर्जाचे प्रमाण योग्य राखल्यामुळेच संस्था सातत्याने मोठ्या प्रमाणावर नफ्यात आहे असे पुढे बोलताना त्यांनी सांगितले.तसेच पतसंस्था असुनही आपली वार्षिक उलाढाल ही अनेक नागरी बँका पेक्षाही जास्त आहे आणि थकबाकीचे प्रमाण मात्र अत्यल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सभेची सुरुवात झाली. उपस्थित सभासदांपुढे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करीत असताना संस्थेच्या मागील आर्थिक वर्षातील प्रगतशील वाटचालीचा लेखा-जोखा मांडला. ३१मार्च २०२६ अखेर संस्थेची सभासद संख्या ७०४४ असून भाग भांडवल ६ कोटी ५ लाख असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षापेक्षा २८% नी ठेवीमध्ये वाढ होऊन संस्थेकडे ९७.२५ कोटी रुपये इतक्या ठेवी असून संस्थेने स्वनिधीतून सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी ७३.७२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे आणि मागील वर्षाच्या तुलनेत कर्ज वाटपात ४६% एवढी विक्रमी वाढ नोंदवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.संस्थेची इतर बँकेतील गुंतवणूक ३७.३० कोटी आणि नफ्यातून तरतूद करून तयार केलेल्या वेगवेगळ्या निधीची ९.७१ कोटी रु इतकी गुंतवणूक अशी एकूण ४७ कोटी रुपयाची गुंतवणूक विविध बँकांमध्ये केली असल्याचे नमूद केले. संस्थेने निव्वळ थकबाकीचे प्रमाण १.९८ % इतके अत्यल्प राखण्यात यश मिळवले असून संस्थेला मार्च अखेर १.८२ कोटी रु इतका घवघवीत नफा झाल्याचे तसेच संस्थेला नेहमीप्रमाणे याही वर्षी ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाल्याचे सांगितले. सभासदांना त्यांच्या भागभांडवल्याच्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १२ % लाभांष देण्याचे जाहीर केले तेव्हा सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात या वार्षिक अहवालाचे स्वागत करून एकमतने मान्यता दिली.

सभेच्या सुरुवातीला सहकार बोर्डाचे मधुकर जाधव यांनी कायद्यातील सर्व तरतुदीला अनुसरून आणि नियमांचे काटेकोर पालन करून त्याचप्रमाणे ऑडिटच्या प्रत्येक निकषावर योग्य दिशेने संस्था वाटचाल करीत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सहकार कायद्यातील तरतुदी,नियम, ऑडिटचे निकष आणि संस्थेची आर्थिक हिशोब पत्रके, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक याच्याबाबतीत उपस्थित सभासदांना सविस्तर अशी माहिती विशद केली.

या सभेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष शाम जाधव, सचिव डॉ. हर्षल डंबळ,संचालक रमाकांत घोडके,शशिकांत वैराळे, नंदकुमार भुतेकर,व्यंकटेश राजे,सुधाकर कुलकर्णी,विजयालक्ष्मी पांढरे,विमल यादव,सविता थोरात,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन सावंत त्याचप्रमाणे मान्यवर सभासद मकरंद राजेनिंबाळकर,उमेश राजेनिंबाळकर,जयंत पाटील,अॅड डी.डी मडके, अॅड जी.व्ही देशमुख अॅड,प्रवीण शिंदे ,अॅड. विश्श्वेर कुलकर्णी,अॅड दर्शन कोळगे,मनोज पडवळ, जयप्रकाश कोळगे, अविनाश यादव, अरविंद जाधव, विजयसिंह जाधव, प्रभाकर लोंढे तसेच सर्व शाखेचे शाखाधिकारी, कर्मचारी, संक्षेप ठेव प्रतिनिधी संस्थेचे सभासद कर्जदार,ठेवीदार,हितचिंतक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष शाम जाधव यांनी केले. राष्ट्रगीत आणि त्यानंतर सुरुची भोजनाने सभेची सांगता झाली. सभा अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

 
Top