धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, उस्मानाबाद येथील फार्मसी विभागाची विद्यार्थिनी कु. उजमा जलील शेख हिची टी सी एस, मुंबई येथे 'प्रोसेस असोसिएट फार्माकोव्हिजिलन्स' या पदावर उल्लेखनीय निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने यांनी उजमा शेख हिचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांना उद्योगविश्वातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या इंटर्नशिप व इंडस्ट्री-ओरिएंटेड प्रशिक्षण कार्यक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. महाविद्यालयाने विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत केलेल्या सामंजस्य करारांमुळे विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध होत आहेत. विशेषतः मेडिकल कोडिंग आणि फार्माकोव्हिजिलन्स इंटर्नशिप प्रोग्राममुळे विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील आधुनिक औद्योगिक कार्यपद्धती, आवश्यक कौशल्ये आणि व्यावसायिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळत असून, त्याचा विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये मोठा फायदा होत आहे. या प्रशिक्षणाचा कु. उजमा शेख हिच्या टी सी एस मधील निवडीसाठी विशेष उपयोग झाला.
विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, शिस्त, सातत्य, प्रभावी संवादकौशल्ये म्हणजेच सॉफ्ट स्किल्स, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन हे त्यांच्या यशाचे प्रमुख घटक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक औद्योगिक क्षेत्रात यशस्वी करिअर घडविता येते, हे कु. उजमा शेख हिच्या यशातून अधोरेखित झाले आहे. या निवडीसाठी महाविद्यालयाचे प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. जी. बी. चिवटे आणि प्रा. अशोक जगताप यांनी कु. उजमा शेख हिला विशेष मार्गदर्शन केले. तसेच प्रा. संदीप नालगे आणि प्रा. एन. एन. नाईकवाडी यांनीही निवड प्रक्रियेदरम्यान मोलाची मदत व मार्गदर्शन केले.
फार्मसी विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध इंटर्नशिप व उद्योगाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांच्या समन्वयक आणि फार्मसी विभागप्रमुख डॉ. प्रीती माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबतच उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक व्यावहारिक ज्ञान, तांत्रिक कौशल्ये आणि रोजगाराभिमुख क्षमता विकसित करण्यावर विभागाचा विशेष भर आहे.
