धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील गावसुद येथील हरिकेश नागनाथ गाडेकर यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. केंद्रीय आरोग्य शासकीय योजना (सीजीएचएस), पुणे येथे कार्यरत नागनाथ मारुती गाडेकर व देवकन्या नागनाथ गाडेकर यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांसह गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
हरिकेश गाडेकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांची ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, गया येथे निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून प्रवेश केला आहे. लहानपणापासूनच देशसेवेची ओढ आणि सैन्यात अधिकारी होण्याचे ध्येय मनाशी बाळगून हरिकेश यांनी अभ्यास आणि तयारीला प्राधान्य दिले. सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी हे यश संपादन केले.
हरिकेश यांना सैन्याच्या गणवेशात अधिकारी म्हणून पाहण्याचे स्वप्न त्यांच्या कुटुंबीयांचे होते. विशेषतः आजोबांची इच्छा नातवाने पूर्ण केल्याने कुटुंबासाठी हा भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला आहे. आई-वडील, आजी-आजोबा तसेच काका-काकी यांनी हरिकेशच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. गाव सुदसह धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनी हरिकेशचे अभिनंदन केले आहे. संरक्षण दलात अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी त्यांचे यश प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे. हरिकेशच्या यशात चुलते व माजी सैनिक अरूण मारूती गाडेकर व अशोक मारूती गाडेकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
