तुळजापूर (प्रतिनिधी)- दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीकडे 10 हजार रुपयांची मागणी करून शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी देत खिशातील 7 हजार 500 रुपये बळजबरीने काढून घेतल्याचा प्रकार तुळजापूर शहरातील बागवान शॉपिंग सेंटरमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष विनायक जाधव (वय 45, रा. ताकविकी, ता. जि. धाराशिव) हे दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी सुमारे 1 वाजता तुळजापूर येथील बागवान शॉपिंग सेंटरमधील कपडे शिवण्याच्या दुकानात काम करत होते. यावेळी आरोपी ओमकार लक्ष्मीकांत भिसे व करण संतोष परदेशी (दोघे रा. तुळजापूर) हे दुकानात आले.

आरोपींनी फिर्यादीकडे 10 हजार रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पैसे कशासाठी आणि का द्यायचे, अशी विचारणा केली असता आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील 7 हजार 500 रुपये बळजबरीने काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी संतोष जाधव यांनी 11 सप्टेंबर रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.


 
Top