भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील वंजारवाडी येथील श्रेयश सुनील बोरकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षेत राज्यात पाचवा क्रमांक मिळविला. त्यांची महसूल सहायक पदासाठी एनटी-बी प्रवर्गातून निवड झाली आहे. या यशाबद्दल त्यांच्या कुटुंबाचा माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे व नगराध्यक्षा संयोगीता गाढवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर श्रेयश बोरकर यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे, त्यांच्या गुणवत्तेला योग्य प्रोत्साहन मिळावे आणि कर्तृत्वाला समाजाचे पाठबळ मिळावे, या उद्देशाने हा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच गणेश जगताप पाटील व युवा समाजसेवक सुदर्शन बोरकर उपस्थित होते. श्रेयश यांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

 
Top