भूम (प्रतिनिधी)- पाथरूड (ता. भूम) येथील कु. डॉ. वैष्णवी राजश्री सुनील दुधाळ यांची महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत अधिष्ठातांच्या तांत्रिक अधिकारी (पशुवैद्यक शास्त्र), गट-ब या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
डॉ. वैष्णवी यांचे प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पाथरूड येथे झाले. त्यानंतर सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, तुळजापूर येथे, तर अकरावी व बारावीचे शिक्षण विज्ञान शाखेतून डॉ. चंद्रभानु सोनवणे कॉलेज, उकडगाव (ता. बार्शी) येथे झाले. त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) येथून बी.व्ही.एस्सी. अँड ए.एच. ही पदवी 2023 मध्ये पूर्ण केली. त्याच वर्षी महाराष्ट्र शासनाच्या सरळसेवा भरतीतून पशुधन पर्यवेक्षक, गट-क या पदावर त्यांची निवड झाली आणि तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय, पंढरपूर (जि. सोलापूर) येथे त्यांनी सेवा सुरू केली.
डॉ. वैष्णवी यांच्या यशामागे पाथरूड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक सुरेश दुधाळ, वाळुंजकर, नवले, पारखे, झनझनेव वीर यांचे मार्गदर्शन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत महत्त्वपूर्ण ठरले.
