धाराशिव (प्रतिनिधी)- गणेश विसर्जनासाठी शहरातून जाणाऱ्या मिरवणुकीतील गणेश भक्तांसाठी महेश वडगावकर कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या वतीने यंदाही मोफत अन्नसेवेचे आयोजन करण्यात आले. अन्नसेवेचे हे बारावे वर्ष असून, यंदा हजारो भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला.

महेश वडगावकर कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या वतीने 2015 पासून गणेश विसर्जनाच्या दिवशी ही अन्नसेवा केली जाते. 2015 मध्ये 30 किलो बुंदी आणि 2 हजार पाणी पाऊचपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा विस्तार यंदा तब्बल 800 किलो अन्नसेवेपर्यंत झाला. यंदा भाविकांसाठी पोहे, हरभऱ्याची उसळ आणि शिरा तयार करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर ही अन्नसेवा करण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या तसेच विसर्जनासाठी आलेल्या हजारो गणेश भक्तांनी या सेवेचा लाभ घेतला.गणेश भक्तांसाठी सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमाचे शहरातील विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.


 
Top