धाराशिव (प्रतिनिधी)- ईटकुर, ता. कळंबचे मुळ रहिवासी आणि गुजरात मधील सरदार पटेल रिनीवेबल एनर्जी रिसर्च सेंटर मधील प्रधान शात्रज्ञ डॉ. मुकुंद गुणवंत आडसुळ यांना संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दि. 27 सप्टेंबर रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन मध्ये ‘मराठवाडा रत्न' पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मराठवाडा जनविकास परिषद, ठाणे यांच्या वतीने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. 27 सप्टेंबर) आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठवाडा जनविकास परिषद ही संस्था गेल्या 17 वर्षांपासून मराठवाड्यातील नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाच्या सोहळ्यात संशोधन, शैक्षणिक, सामाजिक, क्रुषी, पत्रकारिता व प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांची ‘मराठवाडा रत्न' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, स्थानिक खासदार नरेश म्हस्के आणि आमदार संजय केळकर उपस्थित होते. मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत ठाणे येथील गडकरी रंगायतन, तलावपाळी येथे झाला. या कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ‘मराठवाडा मित्र' पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मराठवाडा जन विकास परिषदेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 5 लाख रुपयांचा निधी देण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ. मुकुंद आडसुळ यांच्या संशोधनाची दखल घेऊन त्यांना मराठवाडा रत्न पुरस्काराने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्यांनी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे, मेलबोर्न युनिव्हर्सिटी, ऑष्ट़ेलिया, आय ओ सी फरीदाबाद अशा विविध संस्था मध्ये केलेले संशोधन, त्याव्दारे मिळवलेले 22 पेटंट, 3171 सायटेशन्स, असंख्य शोध निबंध आणी जैव ऊर्जा, बायो एनर्जी मधील संशोधन याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.
यासोबतच क्रुषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री दादासाहेब लाड, प्रशासकीय महेंद्र कल्याणकर, एम आय टी पुणे चे डॉ. मंगेश कराड, जेष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांना मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना मराठवाडा मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी प्रास्ताविक करताना परिषदेची भुमिका व कार्य यावर प्रकाश टाकला. तसेच मराठवाडा विभागातुन ठाण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी साठी ठाण्यात वसतिगृह उभारण्याची मागणी केली. त्यासाठी मान्यवर यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सरनाईक यांनी आपल्या भाषणात सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे कौतुक केले. खासदार नरेश मस्के व आमदार संजय केळकर यांनी ही आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी केले. या कार्यक्रमात ठाण्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर, मराठवाडा विभागातील अनेक सदस्य, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. हा सोहळा अत्यंत नेत्रदीपक पार पडला.
